देवाण घेवाण
बथंड शांतता त्यांच्या मनात,
हिरवाळ पांघरूण आच्छादून
निपचित पडून आपल्याच सुखात,
हेवा वाटावा इतके समृद्ध शांतपण
न जाणो कुठून येते पानापनात,
सारे मानापमान तळाशी लपवून
मौनाच्या व्रतस्थ डोहात.
हळूच बसावं तिथल्या एखाद्याखडकाळ मनावर सावकाश
आणि नुसताच घ्यावा श्वास
उसना पण मनमुराद.
त्या बदल्यात हलकाच फिरवावा हात
झोपलेल्या गवतात,सळसळत वर जाणाऱ्या रानवेलींच्या केसांत.
मनापासून डोळे मिटून चाचपडून पहावं आतआत
काही देण्याजोगे मिळतं का आपल्या कफल्लक मनात
-एखादी सदिच्छा किंवा एखादा आभार,
एखाद-दुसरी आठवण जी निर्माल्य झाली आहे उरात.
काहीच नाही सापडलं तर
हात घालावा आतआत आणि ओढून बाहेर काढावा
'मी'त्चा चा विकार,
अलगद द्यावा सोडून तो ही
तटस्थ झाडांच्या बुंध्यात,
रीतं होत सरसकट
आपल्यातून आपल्यात.
काहीच राहत नाही उणं मग
त्याच्यात' आणि स्वत्वात,
इतकी सरळ सोपी असते
निसर्गाशी देवाण घेवाण.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा