कहाणीतले राजा राणी


अंधुक काही क्षण नारंगी, उमटून जाती आरसपानी
आज अचानक आठवले ते, कहाणीतले राजा राणी
राजा होता दूर देशीचा, इंद्रधनूच्या अश्वांवरचा
राणी मोहक सुंदर बाला, पाहताच तिज मोहून गेला
रोज बहरली प्रेमकहाणी, रंग गुलाबी नभ-आकाशी
कधी हरवती ताऱ्यांमध्ये, कधी उमलती शुभ्र फुलांशी
कसे न कळले कधीतरी पण नजर लागली काय कुणाची
अर्ध्यावाटेवरती सुटली, तुटली रेशीमगाठ मनाची
राजा गेला अपुल्या देशी, राणी पाही वाट नव्याची
अशी संपली जरी कहाणी, व्याकुळते मन सायंकाळी
अनेक स्वप्ने, अबोल चित्रे कशी अडकली त्यांच्याठायी
गालांवरले सुकले पाणी, तरी तरंगते डोळ्यांकाठी
कधी लागती चुकून हाती, जुनीच पाने जीर्ण पुराणी
बघता बघता आठवती मग कहाणीतले राजा राणी

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट