शोध
चाचपडत राहातं मन, दिवाळखोर झालेल्या मेंदूच्या कप्प्यात
तुला धुंडाळत राहतो मग, अस्वस्थतेच्या डबक्यात,
निष्पर्ण विचारांच्या अरण्यात, नाहीतर राहतो पडून जीव निपचित आत-आत तळघरात
तुझी तहान लागत राहते, कोरड पडल्या मनाला,
मलाही बाघायचंच असतं, कुठवर राहणार तूही रुसून आपल्याच नादात?
आणता येईलही तुला, आणलं जर मनात,
बळजबरीने ओरबाडून, माखून निळ्या शाईने माझेच हात
पण तू नसशील तेव्हा, असेल तुझा विवस्त्र आभास,
आणि मी हि कसा उरेन? विरघळून जाईन लाजेने पुन्हा पुन्हा माझ्यात
त्यापेक्षा तू स्वतःच ये, जेव्हा तुला यावंसं वाटेल तेव्हा,
सावरून साज शृंगार, शब्दांच्या किंवा भावनांच्या सजग, समृद्ध अलंकारांत
मी तोवर उघडून ठेवीन नेणिवेची कवाडं आरपार,
आणि पसरून ठेवीन शुभ्र सफेद गालिचे अंतराच्या दालनात
मग उतरशील तू माझ्या आतड्यांच्या जटांतून बेभान,
उरवून माझे शव मागे, पसरत कागदाच्या असमर्थ प्रदेशात
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा