लोणचं


साहित्य:
पिकत चाललेलं आयुष्य
दोन- चार आवर्जून पाहिलेली स्वप्नं
प्रेमाची एक नजर
गोड टवटवीत मैत्र
मुठभर आंबट गोड अनुभव
काही सदिच्छा, आशीर्वाद
आणि 'मी'पण (चवीनुसार)

कृती:

पिकलेल्या आयुष्याच्या सुचतील तश्या लहानसहान आठवणी मनात घोटून घ्याव्यात. त्यात आंबट गोड अनुभवांचे मिश्रण घालून छान मिसळून घ्यावं. रसाळ, लाघट मैत्रीचा पाक घालून मिश्रण चांगले एकत्रित करून घ्यावे, जेणेकरून आयुष्यातला कडवटपणा आपसूक निघून जाईल. नंतर त्यावर स्वप्नं, अपेक्षांची खमंग फोडणी टाकावी. त्यावर सदिच्छा आशीर्वादांचे काही क्षण भुरभुरावे. वरून हलकीच प्रेमाची नजर पेरावी. शेवटी साऱ्यात, गरजे पुरतेच 'मी' पण घालून, सारे एकत्रित करून मनाच्या कप्प्यात साठवून ठेवावे.

टिपा:हे लोणचं मुरायला जास्त वेळ लागत नाही. एखाद्या एकांत दुपारी शांततेच्या जोडीला हे लोणचं खूपच चविष्ट लागते.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय पोस्ट