सगळं काही छान चाललंय
सगळं काही छान चाललंय
फक्त थोडासा थकवा आला आहे
म्हणून चेहेरा कोमेजलासा दिसत आहे
झोप आलीच आज क्षणभर
तर उद्या डोळ्यांखालची वर्तुळं होतील पुसट.
लालबुंद डोळे फक्त अश्रूंनी होत नाहीत,
कधीकधी आतली आग डोकावते नजरेतून.
बरंच काही शिकल्यावर हे अगदी सहज जमतं
घोटभर पाणी पिऊन सारं शांत होतं
कित्येक वणवे विझले, विझवले
धुरांचे ढग होऊन कित्येकदा बरसले.
गुदमरण्याची कला सगळ्यांनाच नाही जमत
श्वास रोखूनही जगता येणं अंगवळणी पडतं.
पण काळजी करण्याचं कारण नाही
तुला वाटतंय तसं काहीच नाहीये
सगळं काही छान चाललंय
विचारांच्या मुंग्या धावतात कधीतरी सैरावैरा,
नखं खरवडत राहतात प्रश्नांचे पापुद्रे अधेमध्ये,
पण आता पावलं गारठली आहेत.
पाठीला काळोखाची राख फासली आहे.
मन मोठं ठेवायचं, शरीर आक्रसून टाकायचं
मग मनाचा देव होतो आपसूकच
राहतो तनाचा पाचोळा,
पण काळजी करण्याचं कारण नाही
तुला वाटतंय तसं काहीच नाहीये
सगळं काही छान चाललंय
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा