निबिड


लांबसडक स्निग्ध बोटांतून
झिरपत वाहणाऱ्या तेलाच्या धारेला,
खोलवर जिरवत,
ती बरंच काही आत मुरवत असते.
मुळांत रुतणाऱ्या स्पर्शाने अलगद उठणाऱ्या आठवणी,
शोधत येतात तिला त्या क्षणांत,
आणि मग कित्येकदा हरवून सापडते ती
आपल्या पूर्वीच्या अस्तित्वाला.
असाच रुतत असे मायेचा हात तिच्याही लहानपणी
आणि तेव्हाही असंच हरवून जात असावं कोणी,
हुडकत स्वतःला,
खोल रुजवत तेलकट बोटे.
कित्येक पिढ्यांचे स्पर्श वाहत असतील असे
माथ्यातून मनात, मनातून बोटांत,
वाहून आणत गाळ
त्या साऱ्या स्त्री-जन्मांचा,
आणि कित्येक जणी अजूनही
खेळत असतील लपंडाव,
शोधत स्वतःला
त्या काळ्याशार
निबिड
अरण्यात.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट