वळीव


चित्रांचे सारेच अर्थ कॅनव्हासवर उतरत नसतात,
बऱ्याचदा कुंचले बरंच काहीसं आत मनात राखून ठेवतात,
रंग थोडे बुजरे होतात, सारेच साऱ्यात मिसळत नसतात,
कॅनव्हासपर्यंत पोहोचण्याआधीच अवसान ढाळून मोकळे होतात.
शब्दांचंही असंच काहीसं , नेहेमीच कुठे मन मोकळं करतात?
येईस्तोवर ओठांपर्यंत घासून रगडून बोथट होतात.
जमवून ठरवून अक्षरांचे पुंजके जीभेशी गर्दी करतात,
पण बाहेर पडताना नेमक्या वेळेस घात करुन पसार होतात.
त्या साऱ्या अस्पष्ट, अस्फुट रंगांचे, शब्दांचे मनात मग नाद होऊन घुमत राहतात,
आत आत तळघरात चुटपुट लावून व्याकूळ करतात.
उगाच संशयाची मळभ पसरवून गरजतात, डोळ्यांत चमकून जातात,
आणि मग ऐन वैशाखात ध्यानीमनी नसतानाही वेल्हाळ वळीव होऊन कोसळतात.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट