फोटो


बऱ्याच वर्षांपूवीचा एक फोटो
तुझा नि माझा, आज हाती लागला
आणि बऱ्याच वर्षांपूवीच्या आठवणी
धूसर झाल्या

नव्हतो आपण असे कधीच
त्या फोटोतल्यासारखे इतके स्पष्ट,
इतके थेट,
कधी न्याहाळलेच नव्हते आपण
फुलापानांइतकेच देठ.

किती रहस्य, किती खोल दडलेलं
दोघांच्या पोकळीत,
आठवते मात्र नुसतीच दोहोंतली
प्रसन्न मोकळीक.

कधी कधी खरंही बोलतं आयुष्य
कृत्रिम साठवणीतून
मग शोधत राहायचं आपणच आपल्याला
तरंगणाऱ्या आठवणीतून...

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट