तू आकाशी ...

तू आकाशी अन मी सागरी
क्षितिजावरल्या आपुल्या भेटी
कधी  निळ्या  तर  कधी  गुलाबी
साखरझोपेमधल्या  गोष्टी

चांद  कधी  तर  कधी  चांदणी
लेवून  येशी रोज ललाटी
शहार अंगी  चमचम  करती
तुझ्या  रूपाने  माझ्या  लहरी

 लाल फूल मग  सायंकाळी
केसांवरती  रोवून  जाशी
हळूच  रात्री  परत  बिलगशी
घेऊन  चादर  नक्षत्रांची

कधी अवास्तव मेघ  झगडशी
कधी  चिडून  मग  वीज  झटकशी
पाहून  माझ्या  नयनी   पाणी
धाय  मोकलून  रंग  बरसशी

असेच नाते  अपुल्या  नशिबी
कधी  न  जुळणे  अपुल्या हाती
क्षितीजाच्या  या  अबोल  रेषी
भेटत  राहू  सांज-सकाळी

तू आकाशी अन मी सागरी
क्षितिजावरल्या आपुल्या भेटी...

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय पोस्ट