ओळख

काही उशीखाली दडवलेली,
काही पुस्तकांत लपवलेली,
काही बंद डोळ्यांनी लक्ख आकाशात रंगवलेली,
स्वप्नं ...

आज जेव्हा सापडली तेव्हा ती फारच बदललेली दिसली
आता ती काहीशी थोराड, पोक्त आणि दूरची वाटत आहेत
काल-परवापर्यंत पोरसवदा असल्यासारखी 
अंगणात, मनात, डोळ्यात हैदोस घालणारी ती ...
आज एखाद्या अवघडलेल्या  माहेरवाशिणीसारखी
अलगद लांबूनच हसली ...
कुठेसं जाणून कि आता ते दिवस नाहीत,
ते हळवे डोळे नाहीत आणि ते वेडं मन ही नाही

कुणास ठाऊक त्यांना आता डोळे कसे दिसले असतील
ओळखीचे वाटले असतील?
त्यांच्या जागी कधी कोण जाणे
नवीन भाडेकरू राहू लागले आहेत.


सध्या उशीखाली चिंता राहाते,
पुस्तकांत प्रश्नचिन्हं आणि आकाशात ?
आकाशात तरंगते रंगहीन व्यवहारी नजर ...

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट