विस्मृती


उतरती पाऊले पडती वळणाच्या वाटेवरती
स्मरणाच्या माळेमधूनी हळूवार निसटती मोती

जे आठवते ते धूसर, मन धुक्यात हरवून जाई
आताच बोलले काही ओठांशी परतुनी येई

मग अवघडल्या डोळ्यांनी, मन मनाचेच अपराधी
कुणी मजेत थट्टा करती, कुणी करती कीव उगाची

सारखे जुने आभाळ डोळ्यात दाटुनी येई
पापण्यात हलके हलके थांबून पांगुनी जाई

एकेक उडून ते जाई स्मरणाच्या फांदीवरूनी
निष्पर्ण अबोल तरुशी मन खिन्न बसुनिया राही

त्या गळलेल्या पानांची, त्या विरल्या आठवणींची
काळाच्या पडद्यामागे का होत असे का गर्दी?

रुजतील परत नव्याने का त्या ओल्या मातीशी
सरसरून उगवूनी येतील का आठवणींच्या दाटी?

हा विचार जेव्हा येई, मन कापूस पिंजर होई
हळूवार तरंगत उडूनी त्या झाडीत अडकूनी राही

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट