भेटणे अपुले असे


भेटणे अपुले असे शरदातले, शिशिरातले
पालवी स्फुरते मना, कधी पानगळती ती सले

वाटणे कधी ओळखीचे एवढे आरश्यातले
काढुनी घ्यावे कसे प्रतिबिंब हे आपापले

सांगणे सांगून जाते नेमके डोळ्यांतले
का उगाचच खेळशी मग खेळ ते शब्दांतले?

गुंतणे आपुले असे दोघांतूनी एकातले
गुंतलेले बंध अपुले, आपुले आपल्यातले

वाहणे आहे तुझे ओढाळल्या पाण्यातले
वाहुनी नेलेस सारे माझ्यातुनी माझ्यातले

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट