धूळ
आपल्या अगणित कणांचे ब्रम्हांड घेऊन
ती स्थिरावते माझ्यासमोर.
बरेचसे संदर्भ सांगत तिच्या अस्तित्वाचे,
निपचित पडून राहते.
मीही जुळवून पाहतो मग
माझ्याकडचे असामान्य समान धागे,
अंथरलेल्या त्या असंख्य कणांच्या
अस्पर्श पटलाशी.
कितीतरी रंग जुळतात,
अनेक गुंते, काही गाठी
ओळखीच्या सापडतात त्यांच्या पोकळीत.
दिसतात अनेक तिच्यात मिळून गेलेल्य
आशा- आकांक्षांच्या छटा,
कित्येकदा झटकूनही
पुन्हा पुन्हा परतून येतात
त्यांच्यात माझेच स्वप्नांचे थवे.
पाहता पाहता दूरवर पसरलेल्या त्या वाळवंटासाठी,
ऊर भरून पूर येतो,
पण त्या कणांपर्यंत पोहोचत नाही पाणी.
सुकलेल्या त्या अस्पर्श पृष्ठभागावर
मग दिसू लागते भविष्याची ग्वाही
जाणून, उमजून की पुढे केव्हा तरी
अशीच वेळ येईल,
तेव्हाही मी असेन
पण तिच्यातला बनून एक.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा