नामनिराळा
कुठे कुठल्या अंतराळात तुझा निवास
तुलाही कदाचित ठाऊक नसावं.
सतत तुला तुझ्या निर्मितीच्या चिंता,
आणि कालातीत अनंताचे व्याप,
न सरणाऱ्या भाबड्या नवसांचे आघात,
आणि तरीही ना-कर्तेपणाचा सततचा शाप
आणि इथे मी, अगदीच व्यस्त,
माझ्याच विटाळल्या गोतावळ्यात,
माझ्या लढायांत आणि त्यातून उभ्या केलेल्या
माझ्याच इंचभर साम्राज्यात..
तुझं जग वेगळंच, अस्तित्वही आगळं
मी, माझं मी-पण मला आपलं साजरं
पाहिलं तर तसा काहीच संबंध नाही आपला,
तू तिथे अनंतात आणि मी माझ्या व्यापात,
तरी आतड्याच्या गाठीतून माझ्या आहे
एक लांबसडक जाणारी गुप्त वाट
जी बेधडक जाऊन पोहोचते
तुझ्या कुठल्याश्या अंतर्मनात
आणि येत राहतात सतत काहीसे
अंधुक, अजाण आवाज-
योग्य-अयोग्य, नीती-अनीतीचे
किंवा तसलेच तत्सम नेणिवांचे अंतर्नाद ..
माझ्या साऱ्या पसाऱ्यात आहे कुणाला वेळ
द्यायला त्या नादांचे प्रतिसाद?
पण कशी कोण जाणे आपोआप
नेहमीच पडतात पाऊले वाटेवर सरळ,
आणि कित्येक निर्णय संभ्रमातले
देतात उजवे कौल,
धुकधुकत राहते सद्भावनेची वात,
उगाच घमघमत राहतं मन
उसन्या चांगुलपणाच्या वासात.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा