रंग तुझा


असे कितीतरी रंग आहेत तू फासलेले,
त्वचेत खोलवर रुजलेले,
जे आता निघता निघणार नाहीत.
आहे तुझ्या स्पर्शाचा उन्हेरी पिवळा
जो उमटत असतो अधूनमधून अजूनहि शरीरावर,
दरवळत राहतो मनात रंग कधी आपल्या पिकत,
हिरवट होत गेलेल्या नात्याचा,
कधी राखाडी, काळ्या सावल्यांचे गुंफलेले हात
तर कधी आठवणींच्या वाळूवर उमटत राहणारे
चंदेरी पावलांचे ठसे,
उठतात तुझ्या त्या तिखट लाल बोलण्याचे व्रण
तर कधी ऐकू येतात हवेवर तरंगत येणारे
तुझ्या हळुवार गुलाबी हाकांचे नाद,
तू दिलेले आणि ओंजळभरून वाहणारे सोनेरी क्षण,
आणि आभाळभर पसरलेले तुझ्या श्वासांचे
आश्वस्त निळे अंबर,
असे कितीतरी रंग आहेत तुझे
माझ्यातुन मलाच रंगवणारे,
आकंठ बुडवणारे,
चिंब करणारे,
पण नेणिवेच्या पटलावर
शोधत असतो मी एकच रंग आता,
हरवत चाललेला,
धूसर होत जाणारा,
रंग तुझा
माझ्यात मिसळणारा.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट