सिग्नल
इवलेसे कळकट्ट हात धावत येतात खिडकीपाशी.
त्यांचा कुबट वास आणि
पोटाची खोल खळगी दाखवणारी निर्भय नजर
खिडकीतून आत मनापर्यंत शिरते खोलवर...
"कशाला द्यायचे पैसे?", "सवय होते हात पसरण्याची"
"हाकलून लावायचं, चला पळा रे ",माझ्या आप्तांचा फुत्कार कानात...
"असं कसं?, काहीतरी केलं पाहिजे आपण " - मी फक्त मनात.
"तेही श्वास घेतात , त्यांचीही हाडं वाढतात आणि भुकही नाचते पोटात,
तोपर्यंत ते इवलेसे कळकट्ट हात असेच खिडकीपाशी धावणार,
काही गोष्टी आता नाही येत बदलता ..."- मी आप्तांना (मनात)!
लाजिरवाण्या माझ्या हातांची मग कबुतरं होऊन,
चाचपडू लागतात खिसे
आणि खळखळतात काही नाणी मनात,
पण पुढे मात्र केलं जातं एकंच
त्यातल्या त्यात ...
मग ती अभिमानी नजर आणि ज्वलंत विचार घेऊन
टॅक्सी थांबते शॉपिंग मॉलपाशी,
तेव्हा मन झालेलं असतं परीपक्व,
शुल्लक वेळ आणि नोटा उडवण्यास,
एक महागड्या कॉफीसोबत
'इवल्याश्या कळकट्ट हातांबद्दल'
विचार करण्यास.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा