दरवळ


कधी उंच कड्याकपारी ढग मनात साचवून
बसता यायला हवं,
अलगद मन मोकळं करत शांतपणे
बरसता यायला हवं,
स्वतःतून स्वतःत झिरपत आत आत ,
झरता यायला हवं,
एकेक क्षण साचवून, थेंब-थेंबाने
वाहता यायला हवं ,
वाहता वाहता जाणून बुजून मातीत
रुतता यायला हवं
शिरून मुळापाळांत, कुणाचा श्वास
होता यायला हवं,
पेशीपेशींत भिनून कुणात समरस
होता यायला हवं,
रसरसून फुलून ओठी कुणाच्या
खुलता यायला हवं
दरवळून शेवटी देवघरात
निर्माल्य होता यायला हवं

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट