अजून


म्हटलं बघूया आणून आव
तूर्तास  प्रौढपणाचा,
म्हणून वाढू दिली दाढी मिशी
सुकत चाललेल्या गवतासारखी,
थोडी पांढरी,थोडी काळी,
पावसाळे ओसरून गेलेल्या,
हिरवेपण ऊडुन गेलेल्या
बेफिकीर माळरानासारखी.
वाढलीही ती झरझर, 
पसरत गेली इतस्ततः
सरसरधसमुसळ्या खुरट्या
झुडपांसारखी.
पण अश्या वाढण्याला काय अर्थ?
ही तर नुसतीच रानवाढ...
त्यात बहरले आहेत कुठे अजून तात्विक विचारांचे बहावे?
दिसत नाहीत अजून मोहोर रसरशीत मधाळ ज्ञान-फळांचे,
अजून झाली आहेत कुठे रिती सारं देऊन सुखवस्तू झालेली मनाची पात्रं?
खूप काहीतरी राहिलं अजून उगवायचं आतून ..
लागायची आहे झळ अजून जाणतेपणाची,
अंगवळणी पडायची आहे सवय ऋतू पालटाची,
सारी मुळं घट्ट रोवून तटस्थ ऊभं राहण्याची,
आणि जायचे आहेत बरेच पावसाळे अजून, 
येण्यापूर्वी तशी उन्हं  शहाणपणाची...

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट