काहीतरी चुकतंय


तसं वरवर पाहिलं तर कुठं काय अडतंय?
पण चाचपून पाहिलं तर बरंच काही दुखतंय
कळण्याअगोदरच मन, मनातून निसटतंय...
काहीतरी चुकतंय, कुठंतरी खुपतंय
काहीतरी चुकतंय......
जुनं केवड्याचं झाड अजूनही वाकतंय
फुलांचा जर्द वास वाटेवर टाकतंय
तुला सारं ठाऊक आहे, तुला सारं कळतंय
तुझं पाऊल तरीही पिवळ्या फुलांवर पडतंय
काहीतरी चुकतंय......
रमवायचं म्हटलं तर मन कशातही रमतंय
थोडंसं जमवलं कि सारं काही जमतंय
तेवत ठेवलेल्या समईचं तेल मात्र हळूहळू सरतंय
आतल्याआत कुठेतरी काही हळुवार मरतंय
काहीतरी चुकतंय......
गम्मत म्हणजे, तुला काही झालंच नाही असं वाटतंय
हे तर चालायचंच, हेच अजून चालतंय
तुझ्या नकळत पण इथे खूप काही साठतंय
कधीचं साचलेलं सारं आता आत आत झिरपतंय
काहीतरी चुकतंय...... कुठंतरी खुपतंय…..
कळण्याअगोदरच मन, मनातून निसटतंय...

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट