बोलघेवडी

तशी ती साधीच
मनातून बोलघेवडी, बाहेरून मुकीच...
कधी चाफ्यापाशी मन मोकळं करणारी
कधी तुळशीला सारं सांगणारी
कधी देवळाच्या पायरीशी गुणगुणणारी
पावलातल्या पैंजणांनी नकार देणारी
हातातल्या कांकणाने होकार देणारी
नुसत्याच डोळ्यांनी बोलणारी
चकार शब्द न काढता वासरा-पाडसांना
मायेने गोंजारणारी
काहीच न बोलता सारं नजरेने उलगडणारी
आज मात्र अगदीच बिथरलेली ... आतूनही
करवंदीच्या झाडीशेजारी निपचित पडलेली
त्याला कपडे सावरत, डोळे लपवत
निघून जाताना पाहणारी,
अस्ताव्यस्त, फाटलेल्या परकराची ठिगळं मोजणारी,
लाजाळूच्या झाडापाशी पडलेलं एक पैंजण बघणारी,
तो कधीचाच निघून गेलेला असताना अजूनही
दुसऱ्या पावलातल्या पैंजणाने नकार देणारी,
तशी ती साधीच
मनातून बोलघेवडी, बाहेरून मुकीच...

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट