तारा निखळून पडताना
आपण समजत असतो नियतीचा निव्वळ सारीपाट
पण कुणाला कुठे ठाऊक असतं दूर अंतराळात
निखळून पडणारा तारा कधीपासूनचा विव्हळत असतो आत आत.
त्याचं लख्ख हसणं आपल्याला दिसतं निरभ्र आकाशात,
पण ते कधीचच विरून गेलेलं असतं गर्द काळोख्या अंधारात,
कित्येक विस्फोट त्याच्यात जन्म घेऊन पावतात अंतर्धान,
सारं लपवून शांतपणे आयुष्यभर चमचमत राहण्याचा शाप,
पण खरं तर सगळा असतो नुसताच आभास.
कितीतरी स्थित्यंतरं पार करून निकराने
शेवटी न राहवून सोडून आपली ऊर्जा सारी
झोकून देतो तो स्वतःला आवेशात, अगम्य काळोखात,
वाहवत दूरवर आपलं अस्तित्व, संपवत वेगात.
आपण मात्र निलाजरेपणे डोळे मिटून घट्ट मागतो
एखादा इच्छापूर्तिचा चमत्कार,
त्याच्या संपण्याच्या प्रवासात आहुती देत
आपल्या बोजड समिधांचा भार.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा