धुमारे


अगदी अलगद मोकळं करता येतं
तुला स्वतःला माझ्यातून,
इतकं सहज की,
तुझं हलकं पीस होउन जातं,
हळुवार स्वच्छंद वाऱ्यावर दूर उडूनही जातं.
मागे मात्र माझा देह अस्थिपंजर उरतो,
पार कोलमडून प्राणहीन कोसळतो.
निपचित पडून काही प्रहर माझ्याच सांत्वनात,
रुजतो तो माझ्या वेदनेच्या लुसलुशीत मातीत,
आणि अजाणतेपणी हळूहळू मग कोंब धरू लागतो.
निलाजरेपणे खुडून अनेकदा आर्जवांच्या पालव्या,
पुन्हा पुन्हा उगवून येतात तुला शोधत माझ्यात
आणि मग
अंगभर फुलून येतात जुन्या दिवसांचे धुमारे
तुझ्या आठवणींनी प्रत्येक उमाळ्यात.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट