सत्य


सत्य पचवणं तितकंसं सोपं नसतं
कित्येकदा समोर ठेवलेल्या कडू औषधासारखं
ते आपल्यासमोर पडून असतं कित्येक दिवस.
भ्रमाचा रोग बरा करण्यासाठी घ्यावं तर लागणारच कधी ना कधी, 
पण ते गिळायला आधी थोडी सवड द्यावी लागते.
मग पुढे ते गिळायची क्षमता आलीच,
तर डोळे शांत मिटून,आवंढा गिळून,
मनात न घोळवत ठेवता, चटकन डोक्यात उतरवायचं
कारण मनाला भावनांचा शाप 
मेंदूला मात्र तर्काचा विकार.
चरचरत छाती चिरत उतरत गेलं आतवर
की मग मनाच्या खोल कप्प्यात 
हेही राहतं साठून,
गोठत चाललेल्या मनाला
अजून थंडगार करत.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट