पाकळ्या


अनेकदा खूप काही सांगायचं राहून जातं
काळाच्या पाण्यावर ते अलगद वाहूनही जातं
मग परत फिरताना तीरावर कधी
तरंगताना दिसतात पणत्या अलगद
त्यांची तेवत जाणारी वात फडफडते हवेत
अन देऊन जाते उगाच मनाला हुरहूर
कुठंतरी आतवर.

जागवते त्यांची धग ऐन रात्री, गाढ झोपल्या जाणिवांना,
अन डोळे चोळत उठतात थोपटून निजवलेले प्रश्न अनेक -

जर नसते खुडले शब्द तेव्हा फुलू पाहणारे?
जर नसता घातला बांध तेव्हा फुटू पाहणाऱ्या भावनांना?
थोड्या अजून प्रयत्नाने उघडलं असतं का दार?
थोडं अजून सांगून मोकळं झालं असतं का आभाळ?
पडला असता जर कौल ह्या प्रश्नांच्या बाजूने

तर?

तर कदाचित ह्या वाटा वेगळ्या असत्या
कदाचित ह्या तीरावर आपण दोघेही असतो
आणि कदाचित ह्या पणत्यांऐवजी
तरंगत आल्या असत्या
आठवणीतल्या फुलांच्या
सुकून गेलेल्या पाकळ्या.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट