अभिसारिका


गर्भारल्या फुलांची लेवुन रंग कांती
घेऊन अंजनाला बुडवून काळराती
ओशाळल्या निशेचे वेचून तेज-मोती
मृदू आर्त पावलांनी अभिसारिका निघाली

टाकून यौवनांचे ते पाश भोवताली
स्मितात चांदण्यांची आरास दिपवावी
हरखून रातराणी तन-गंध विस्मृतावी
अभिसारिका अशीही मिलनास सिद्ध झाली

राही तटी उभी अन् व्याकुळ वाट पाही
अजूनही दिसेना, घटिका समीप आली
काही अजून क्षणिका, थोडा विलंब काही
साशंक त्या मनाला अभिसारिका बजावी

शशि पेंगुळे नभी ही निसटून वेळ जाई
हळुवार पाकळ्यांचे तोडून खुड काही
आपुल्या खुळ्या मनाला जाणून दोष देई
अभिसारिका दवांचे आक्रंद टीप वाही

ही आजही पुन्हा सरून वांझ रात गेली
ही आजही पुन्हा विझून आस-वात गेली
कधीतरी प्रियाशी एकांत भेट व्हावी
अभिसारिका म्हणुनी हर रात सज्ज होई

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट