कात


असाही एक एक दिवस येतो
जेव्हा सुप्त जाणीवांना भरून येतं
आणि कधी काठापर्यंत येईपर्यंत सारं काही सरून जातं.

पण कधीकधी रीतसर रिकाम्या करून,
उलटून ठेवलेल्या मनालाही
परत ओल धरू लागते
आणि उशाखाली उग्र स्वप्नांची अनाहत झळ लागते.

घट्ट धरून ठेवल्या भावनांची मूठ
अलगद मोकळी होते त्या दिवशी,
कोपर्‍या कोपर्‍यात अडवून धरलेलं कितीतरी
सुटू पहातं वेल्हाळपणे,

अश्यावेळी दटावून स्वतःला
उकरून आपलीच माती संस्काराची
आणि विटा काही विवेकाच्या,
बांध घालून रुतवून ठेवायच्या त्या बेभान मनासमोर
आणि आपणच ओढायची आपल्याभोवती लक्ष्मणरेष.

मग कृष्णाच्या पावलांना स्पर्श करून
माघारी फिरणाऱ्या नर्मदेसारखं विझतं मनातलं वादळ.
दृष्टांत मिळावा तसा लक्ख झगमगाट होतो आत
आणि मागे वळून पाहिल्यावर दिसते
आपण नुकतीच टाकलेली वासनेची कात.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट