सांजभोवरी


त्या भग्न देवळापाशी, त्या मधाळ सायंकाळी
किरणांचे अनवट धागे, ओघवते उतरत जाती

ओझरते काही माझे, वार्‍यात घुसळूनी जाते
त्या सांजभोवरी संगे मन मनास उसवत जाते

तो पाचोळा मग फिरूनी पायात गुंतूनी राही
अन बंद पापण्यांखाली शिशिराचे माणिक मोती

सरणार्‍या दिवसाकाठी नभ मिटतो उन-पिसारे
चाहूल देत असे कानी रात्रीचे थंड उसासे

परतीच्या वाटेवरती वाऱ्याची भोवर फिरती
मन भग्न देवळापाशी, निर्जीव पाऊले पडती

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट