नातं
आणि जमलंच तर ते टिकवावंही लागतं.
त्याचा तलम पोत तसाच रहात नाही नेहेमी,
पुढे हळूहळू जीर्ण होत जातो.
मग झटकून जरा पुन्हा कधी ते
आयुष्याच्या उन्हात पसरून घातलं
की जरा कुठे तरतरी येते,
मनाला आणि नात्यालाही.
तुझी सवय जाणुन
आपल्या नात्याचा छोटासाच भाग
तुझ्याकडे ठेवला आहे.
उरलेलं सारं माझ्या जबाबदारीत.
ठिगळं शिवून शिवून, झटकून, वाळवून,
जेवढं जमलं तेवढं टिकवून ठेवलं आहे मी.
माहीत नाही अजून कधीपर्यंत जमेल.
म्हणुनच आता ठरवलय,
आहे तेवढं माझ्याकडचं तसंच घडी घालून
ठेवून द्यायचं कपाटात.
बघुया, तुला तुझा छोटासा भाग कितपत
सांभाळता येतो ते...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा