पैलतीरी


पैलतीरावरी उभी कधीची
सूर्य पेंगुळे क्षितिजावरती
यमुनेच्या काळ्या लाटांवर 
अधीर होई राधेचे मन

दिवस कधीचा जाई विरुनी
सख्या, पाखरे जाती फिरुनी
अर्धे मन घरच्या वाटेवर
अजून नाही आला माधव

तुला वाटे ओढ कधी ही?
तुझ्यात राधा जगली जळली 
मनास जडला रोग निळ्याचा
आता यातून सुटका कसली

कधीच नाही तुला समजली
प्रीत खुळ्या त्या परिजाताची
परक्या दारी नांदत नांदत
फुले सांडते तुझ्याच चरणी

उद्या परत मग नवी कहाणी
खट्याळ डोळ्यांची नवलाई
परत फसे मग वेडी राधा
मुरलीच्या त्या धुंद स्वरांनी

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट