चुकलेल्या वाटा काही

चुकलेल्या वाटा काही
आठवणींच्या रानीवनी
पापण्यांखालून धावुनी 
मिळतात नदीला जाउनी
होडीच्या मनाने मग कधी
सरकत अलगद त्या वाटेवरती
लागावं ओळखीच्या बेटावरती 
पाय पाण्यात सोडूनि 
जुने पक्षी अवतीभवती
कोणाचे हसू वाळूवरती
किती फुले ओठांवरती
पडती ओंजळीत येऊनि 
एक सैर मातीवरती
ठसे पाठलाग करती
अजून वाट पायथ्याशी
आठवणींच्या अफाट देशी
चुकलेल्या वाटा काही
वेळ आता परतण्याची
पण पाखरे हुरहूर करती
ओढ जुन्या घरट्याची

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट