कवडसे
शुभ्र चांदण्यांचे कवडसे जेव्हा
अर्धवट उघड्या खडकीतून डोकावतात
आणि धावतो थंड उसासे देत वारा
पड्यद्यांच्या पदरावरून
आठवतात त्या रात्री ...
आठवतं टेकडीवर तासन् तास उभे राहून
टेलेस्कोपमधून न्याहळलेले आकाशाचे ते अंतरंग
आणि मनाचे पापुद्रे अलगद सोडवणारी
ती सुन्न शांतता...
ओलसर गवतावर निजून
दिसणारी ती तुझी उभी प्रतिमा
आणि मागे अथांग वाहवत जाणारं अवकाश...
आठवतात ती उगाच मोकळ्या उनाड रानवाटांची
पाठलाग करत जाणारी आपली पाऊलं
आणि साथीला चालणारे तुझे शब्द
कधी ओठांतले, कधी स्पर्शातले
तर कधी नुसत्याच डोळ्यांतले...
आठवतो तो तुझ्या ग्लासमधला
थंड समुद्र अन् श्वासागणिक अंग जाळीत
आयुष्य सोडणारा तो धुर..
तुझ्या खिडकीतून दिसणारं
चमचमणारं शहरी कृत्रिम आकाश
आणि तुझ्या नजरेतलं वादळ...
तुला नसेलही आठवत काहीच यातलं
पण त्याची तक्रार नाही
उलट माझच मला नवल वाटतं
तू शेजारीच, अगदी बाजूला
तुझ्या गाढ झोपेत असतानाही
मी मात्र रोज ह्या आठवणींच्या
पाऊलखुणा शोधत आहे...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा